‘स्वराज्य रक्षक संभाजी महाराज’ ही मराठी serial बघताना एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते की एखाद्या मराठी माणसाला पुढे जाण्यापासून रोखण्यासाठी, त्याला मागे खेचण्यासाठी बाहेरच्यांपेक्षा जवळची व ओळखीची व्यक्ती किती कारणीभूत असतात ते. साक्षात शिवपुत्राला स्वकीयांकडूनच जर एवढा त्रास होऊ शकतो तर प्रगती करणाऱ्या सामान्य व्यक्तीला किती त्रास होत असेल. हो नक्कीच होत असणार, म्हणूनच तर मराठी माणूस एवढा शूरवीर, धाडसी तरी तो नेहमी आपल्या पाठीवर ढाल घेऊन असतो कारण त्याला कुठेतरी माहीत असते की आपल्यावर चुकून ही वार झाला तर तो पाठीवरची होईल, आणि तो करणारे आपलेच असतील. छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवन चरित्रातून ते वारंवार सिद्ध झाले आहे.
पण, एक मराठी माणूस म्हणून मला एक प्रश्न नेहमीच पडतो की आपल्याच माणसाला मागे खेचून काय फायदा होत असेल ? , कारण एखाद्याला मागे खेचताना मागे खेचणारा व्यक्ती ही आपसूक मागेच जातो , म्हणजेच ना त्याची प्रगती होत ना दुसऱ्याची , किती संकुचित वृत्तीचे प्रमाण असेल हे. ह्याच वृत्तीमुळे, मराठी समाज ज्याची धमक दिल्ली वर राज्य करण्याची आहे , तो समाज ७० वर्षांच्या स्वातंत्र्यानंतरही एकही पंतप्रधान देऊ शकला नाही. चित्रपटसुष्टी एका मराठी माणसाने निर्माण केली पण आज एकही मराठी नट किंवा नटी Bollywood मध्ये top ला सध्या तरी नाही. ज्या क्रिकेट टीम मध्ये अर्ध्याहून अधिक मराठी players असायचे त्या टीम मध्ये आता मराठी player कधीतरी दिसतो. जे राज्य कधी पहिल्या स्थानावर होते ते आता सहाव्या स्थानावर आहे. ह्या सगळ्याला कुठेतरी आपली संकुचित वृत्तीच कारणीभूत असावी ह्याला दुमत नसावे.
आपले आराध्य छत्रपती शिवाजी महाराजांना ही स्वराज्य स्थापन करताना स्वकीयांकडून त्रास झाला होता, आणि तो मोडून काढत महाराजांनी अखेर स्वराज्य स्थापन केलेच. ते नेहमी म्हणत ‘स्वराज्य व्हावे ही श्रींची इच्छा ‘ , म्हणजेच ज्यांनी स्वराज्याला विरोध केला त्यांनी कुठेतरी श्रींच्या आशीर्वादाबद्दलच प्रश्न चिन्ह उभे केले. कितीही उलटसुलट प्रयत्न झाले तरी अखेरीस स्वराज्य स्थापन झालेच. म्हणजेच एखाद्याने जीवनात आनंदी व्हावे , समृद्ध व्हावे , प्रगत व्हावे ही जर श्रींची इच्छा असेल तर कोणी कितीही मागे खेचण्याचा प्रयत्न केला तरी अखेरीस सगळे शुभच होते. म्हणूनच तर संभाजी महाराजांना एवढा त्रास देऊन , त्यांची अडवणूक करून सुद्धा ते आज मराठी माणसाच्या मनावर अधिराज्य गाजवतात, आणि त्यांना आडवे जाणाऱ्यांना कोणी चिटपाखरूही ओळखत नाही.
प्रगती करण्याचा अधिकार प्रत्येकालाच आहे. मग एखाद्याने प्रगती केली किंवा त्याचे नाव मोठे झाले तर आपले नुकसान होईल असे मनात येण्याचे काहीच कारण नाही.
मी काही ओळी नमूद करू इच्छितो…
स्वतःचा विचार नक्कीच व्हावा पण त्यात स्वार्थ नसावा । एखाद्यावर राग असू शकतो पण त्यावर द्वेष व मत्सर नसावा। श्रींच्या दयेने आयुष्य सगळ्यांना लाभले आहे ते समृद्ध बनवण्यासाठीच, झालेच तर सर्वांचा त्यास हातभार असावा ।
म्हणूनच जर मराठी बाणा व कणा ताठ ठेवायचा असेल तर प्रत्येक मराठी माणसाला ‘एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंथ’ हे सूत्र पाळावेच लागेल. जेव्हा असे होईल तेव्हा आपण नक्कीच असे अभिमानाने म्हणू की ‘दिल्लीचे ही तक्त राखतो आणि राज्यही करतो महाराष्ट्र माझा’ ।।

जय हिंद !!! जय महाराष्ट्र !!!