‘ स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी’ ही म्हणच सांगून जाते की एखाद्या व्यक्तीच्या जीवनात ‘आई’ चे महत्त्व काय आहे ते.
जन्माला आलेल्या बाळाची जगाशी झालेली पहिली ओळख म्हणजे ‘आई ‘. बाळाचे प्रथम गुरू म्हणजे ‘आई’, मग जर उत्कृष्ट शिष्य घडवायचा असेल तर प्रथम गुरू ने त्याला उत्कृष्ट शिक्षण देणे अत्यंत गरजेचे आहे. बाळ आपल्या आईला बघूनच बोलायला शिकते , ते आई जी भाषा बोलते तीच भाषा प्रथम शिकते म्हणूनच तर तिला ‘मातृभाषा’ असे संबोधले जाते. ‘आई’ म्हणजे मुलांच्या जीवनातील एक आधारस्तंभ , हा आधारस्तंभ जेवढा सक्षम, आनंदी, सकारात्मक तेवढेच मुलांचे जीवन सक्षम, आनंदी आणि सकारात्मक होते.
खरेच ‘आई’ होणे म्हणजे एक मोठी शक्ती, एक मोठी जबाबदारी आहे आणि ती पेलण्याची क्षमता सुद्धा निसर्गाने त्या ‘आई’ मध्ये दिलेली असते. मुलांच्या जडणघडण होण्यामध्ये सर्व परिवाराचे योगदान असतेच, पण ‘आई’ चे योगदान नेहमीच कांकणभर जास्त असते.
जर एखाद्या मातेला वाटत असेल की आपल्या पाल्यांनी हुशार बनावे, सुखी व्हावे, स्वतःचा व्यक्तिमत्त्व विकास करून समाज व देशाचा विकसात हातभार लावावा तर प्रत्येक मातेला त्याचे शिक्षण आपल्या मुलांना असे दिले पाहिजे , जसे आपले आराध्य छत्रपती शिवाजी महाराजांना त्यांच्या मातोश्री म्हणजेच आपल्या सगळ्यांच्या माँसाहेबांनी दिले.
प्रत्येक मातेला वाटत असते की आपल्या मुलाने जगात स्वतःचे नाव करावे, प्रतिष्ठा मिळवावी, पण हे साध्य तेव्हाच होईल जेव्हा आई त्या मुलासमोर स्वतःच्या रूपाने उदाहरण ठेवेल तेव्हा. आपल्या मुलाने अभ्यास करावा असे वाटत असेल तर आईने स्वतःमध्ये अभ्यासु वृत्ती जोपासली पाहिजे. जर वाटत असेल की आपल्या मुलांनी सकारात्मक विचार करावा तर तो कसा करावा ह्याचे प्रात्यक्षिक करून दाखविले पाहिजे. जेव्हा मुलांसमोर आई सुखी, सकारात्मक व यशस्वी आयुष्य कसे जगावे ह्याचे उत्तम उदाहरण पेश करेल तेव्हा मुलांना समजून घेणे आणि समजून सांगणे आईला सोपे जाईल.
आई असणे एक शक्ती आहे आणि त्या शक्ती बरोबरच आपसूक मोठी जबाबदारी येते. मला ‘स्पायडर मॅन’ मधील एक dialogue नमूद करावा असे वाटते – “Great Powers bring Great Responsibilities” व ती पेलण्यासाठी प्रत्येक आईने स्वतःला सक्षम बनविलेच पाहिजे , तरच हा समाज व देश सक्षम बनेल.
