निसर्गाने प्रत्येक मनुष्यास उपजतच वैचारिक स्वातंत्र्य दिले आहे. आपण सगळे ह्या स्वातंत्र्याचा पुरेपूर फायदा घेतोही, खूप विचार करतो आपण सगळे. पण, कधी विचार केला आहे का की आपण जो विचार करतो त्याचा आपल्या मनावर, शरीरावर, आणि आपल्या जीवनात किती परिणाम होतो ते ; तसेच, हे स्वातंत्र्य आपल्याला का व कशासाठी मिळाले ????
एक माणूस दिवसभरत ६००००-८०००० विचार करतो, म्हणजे ताशी २५००-३००० विचार ! पण एक गोष्ट विचारात घेण्यासारखी आहे, ती म्हणजे आपले ९८% विचार जुने किंवा भूतकाळतले असतात , व त्यातलेही ८०% विचार नकारात्मक असतात.
आता प्रश्न असा येतो की नकारात्मक आणि सकारात्मक विचार म्हणजे नेमके काय ? सोप्या भाषेत सांगायचे म्हणजे नकारात्मक विचार म्हणजे ‘चिंता’ आणि सकारात्मक विचार म्हणजे ‘चिंतन’.
आता प्रश्न असा येतो की काय फरक पडतो की आपण सकारात्मक (चिंतन) किंवा नकारात्मक विचार (चिंता) केला तर ?
हो, फरक नक्कीच पडतो, तो कसा ते खाली नमूद केले आहे :
१. नकारात्मक विचार केल्याने आपल्यावरील ताण प्रचंड प्रमाणात वाढतो , व आपल्याला थकल्यासारखे होते. आपल्या शारीरिक, मानसिक, तसेच बौद्धिक क्षमते वर ही विपरीत परिणाम होतो व आपण वारंवार आजारी पडू शकतो. मराठीमध्ये एक म्हण आहे, ‘चिंती परा येई घरा’ म्हणजेच स्वतःबद्दल किंवा दुसर्याबदल मनात वाईट विचार आले की स्वत:चेच वाईट होते.
२. अतिविचार म्हणजे गरजे व क्षमतेपेक्षा खूप विचार करणे. एक म्हण प्राचिलीत आहे की ‘अति तिथे माती’ आणि हा नियम विचारांसुद्धा लागू पाडतो. अति विचाराने आपल्याला फायदा होण्याऐवजी नुकसानच अधिक होते. वेळ तर वाया जातोच पण मानसिक व शारीरिक हानी ही होते. अतिविचार म्हणजेच डोंगर पोखरून उंदीर काढण्यासारखे आहे.
३. सकारात्मक विचार म्हणजे आपले तसेच दुसऱ्याचे भले चिंतने, जेणे करून आपल्याला आनंदी व समाधानी वाटते. सकारात्मक विचार आपल्या जीवनात सकारात्मक बदल घडून आणतात. विचार करताना आपल्याला असे जाणवले असेल की खूप वेळा नकारात्मक विचारांची संख्या खूप असते आणि सकारात्मक विचारांची संख्या खूपच कमी. प्रयत्नपूर्वक व योग्य मार्गदर्शन मिळाले की तुम्हाला सकारात्मक विचारांची संख्या वाढवता येते जेणेकरून तुम्ही तुमच्या जीवनात सकारात्मक गोष्टी घडून आणू शकता.
विचार म्हणजे निसर्गाने आपल्याला दिलेली एक अमोघ शक्ती , तिचा योग्यरित्या वापर होणे हेच आपल्या व सर्वांच्या हिताचे असते.
एक सुंदर दोहा आहे “बोया पेड़ बबूल का आम कहाँ से होये”, म्हणजेच तुम्ही जे पेराल तेच उगवेल. निसर्गाने जरी आपल्याला वैचारिक स्वातंत्र्य दिले असले तरी आपल्या विचारांनी निवडुंग पेरायचे की कासपठार फुलवायचा, हे प्रत्येकाने ठरवणे गरजेचे आहे.

शुभम भवतु 🙏🙏🙏