गुणवत्ता म्हणजे काय ?
प्रत्येक व्यक्तीमधील उपजत गुण व सुप्त शक्तींचे उपयोगितेत होणारे रुपांतर म्हणजे क्षमता होय.
प्रत्येक व्यक्ती जेव्हा जन्माला येतो तेव्हा तो काही तरी चांगले गुण घेऊनच येतो व त्या गुणांचा सदुपयोग करण्याची क्षमता ही उपजत असते. प्रत्येकामध्ये काही न काही चांगले गुण असतातच. काही व्यक्तींना आपल्यातील गुणांची थोड्याअधिक प्रमाणात जाणीव असते. तर काहींमध्येच त्या गुणांचे योग्य प्रकारे उपयोग करण्याचे कौशल्य असते.
व्यक्ती अनेक प्रकारचे असतात पण गुणांच्या बाबतीत बोलायचे झाले तर हे मुख्य प्रकार असू शकतात :
१. काही व्यक्तींना आपल्यातील गुणांची पूर्णपणे जाणीव असते व त्यांच्यात त्या गुणांचा योग्य वापर करण्याची क्षमताही असते, आशा व्यक्तींना गुणवंत म्हणून गणले जाते. त्यांना थोडेसे मार्गदर्शन लाभले की ते जीवनात यशस्वी होतात;
२. ह्यांना माहीतच नसते की आपल्यामध्ये कुठले चांगले गुण आहेत ते. ह्या व्यक्तींना मार्गदर्शनाची नितांत गरज असते, जेणेकरून त्यांना त्यांच्या गुणांची जाणीव होते. ह्या व्यक्तींना ‘Self – analysis’ करणे गरजेचे असते ;
३. काही असे असतात की त्यांना माहीत असते की आपल्यामध्ये काहीतरी चांगले गुण आहेत ते पण ते उपयोगात कसे आणायचे ह्याचे ज्ञान नसते. त्यांच्यामध्ये स्वतः च्या क्षमतेवर विश्वास नसतो. ह्या व्यक्तींना आपला आत्मविश्वास वाढवण्यावर काम करावे लागते ;
४. काही जण असे असतात की त्यांना आपल्यातील चांगले गुण तसेच त्यांचा वापर ह्याचे योग्य ज्ञान असते पण त्यांना त्याचा स्वतःसाठी व समाजासाठी उपयोगात आणण्यात यश येत नसते. असे व्यक्तींना आपल्या ‘implementation skills’ वर जास्त काम करावे लागते ;
५. काही जणांना सगळे ज्ञान असते, त्यांना ते वापरायचे कसे हेही माहीत असते पण काही कारणास्तव ते असे करू इच्छित नसतात. असे वागण्याचे कारण अनेक असू शकतात , जसे आळस, राग, नकारात्मक दृष्टीकोन, इत्यादी. ह्या व्यक्तींना मार्गदर्शनाबरोबर समुपदेशनाचीही गरज असते. कारण, असे बोलले जाते की झोपलेल्या व्यक्तीला उठवणे सोपे असते पण झोपेचे सोंग घेणाऱ्या व्यक्तीला उठवणे अवघड असते.
ह्या 5 प्रकारातील व्यक्तींमध्ये, पहिल्या ४ व्यक्तींना थोडेअधिक मार्गदर्शनाची गरज असते, ती योग्य व्यक्तीकडून , योग्यप्रकारे मिळाली की ते यशाच्या मार्गावर मार्गस्थ होतात.
पण ५व्या प्रकारच्या व्यक्तींना बाकीच्या लोकांपेक्षा जास्त मेहनत घ्यावी लागते. त्यांना सकारात्मक दृष्टिकोन असणाऱ्या व्यक्तींची नितांत गरज असते, जेणेकरून त्यांना सकारात्मक दृष्टिकोन लाभतो आणि यशाचा मार्ग सुकर होतो.
सगळ्यांनी आपण कुठल्या प्रकारात येतो ह्याचे विश्लेषण केले पाहिजे , त्याच बरोबर योग्य मार्गदर्शक शोधून आपल्यातील गुणांची व क्षमतेची जाणीव करून घेणे महत्त्वाचे आहे. तसेच, प्रत्येक व्यक्तीने आपल्यातील गुणांचा सदुपयोग स्वतः च्या व समाजाच्या उद्धारासाठी करणे हे देशहिताचे आहे.

ABLES Coaching and Counselling